Loading...
B. K.

बी. के. पटनाईक

प्राध्यापक, स्कूल ऑफ एक्स्टेन्शन अँड डेव्हलपमेंट स्टडीज, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली

बी. के. पटनाईक यांनी विश्लेषणात्मक व उपयोजित अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, मानव संसाधन व्यवस्थापनात एम.ए. आणि अर्थशास्त्रात वाचस्पती (पीएच.डी.) मिळवली आहे. त्यांच्या गाठीशी संशोधन आणि अध्यापनाच्या विविध राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमधील २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली; राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण संस्था, नवी दिल्ली; ग्रामीण आणि औद्योगिक विकास संशोधन केंद्र, आयसीएसएसआर सेंटर, चंडीगड आणि इत्यादी. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामधील (इग्नू) स्कूल ऑफ एक्स्टेंशन अँड डेव्हलपमेंट स्टडीज, नवी दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जागतिक बँक, अमेरिकी आंतरराष्ट्रीय विकास परिषद, फोर्ड फाउंडेशन, युनिसेफ, युरोपियन कमिशन, यूएनएफपीए, बिल गेट्स फाऊंडेशन अशा आंतरराष्ट्रीय संस्थांनी प्रायोजित केलेल्या; तसेच पंचायती राज, ग्रामीण विकास आणि शासनाचे कुटुंब कल्याण व आरोग्य खाते यांच्याअखत्यारीत २६ प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. या-व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश राज्य सरकारांचे विकासाच्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यात पेयजल आणि स्वच्छता, सीमाभागातील प्रकल्प, स्थलांतरित कामगार, कंत्राटी शेती, अनुसूचित जाती व जमातींवरील अभ्यास, कुटुंबकल्याण व आरोग्य, पंचायत राज्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि विकेंद्रित नियोजन अशा विविध विषयांवरील प्रकल्पांचा समावेश आहे. आजवर प्रा. पटनाईक यांनी स्वतंत्ररित्या दोन पुस्तके लिहिली आहेत, तर चार पुस्तकांचे ते सहलेखक आहेत आणि एका पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे. त्यांचे १२५ पेक्षा अधिक संशोधनपर प्रबंध, लेख, संपादकीय आणि पुस्तक-परीक्षणे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. सध्या ते पॉलिटिकल इकॉनॉमी जर्नल ऑफ इंडिया या नियतकालिकाचे संपादक आहेत. शिवाय ते जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट स्टडीज, अमेरिकन रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी डेव्हलपमेंट, न्यूयॉर्क आणि एशियन जर्नल ऑफ सोशल सायन्सेस अँड ह्यूमॅनिटीज, ओयामा, जपान या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळावर आहेत. विकासविषयक विविध क्षेत्रांतील पीएच.डी. संशोधनाचे मार्गदर्शक म्हणूनही पटनाईक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. मिळालेली आहे. विकासविषयक अभ्यासातील एम.ए. आणि नागरी नियोजनातील पदविका अभ्यासक्रमाची रूपरेषा ठरवण्यात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवाद, अधिवेशने आणि अभ्यास दौऱ्यांत भाग घेतलेला आहे. त्यांनी अमेरिका, चीन, स्पेन आणि फिनलंड या देशांना भेटी दिलेल्या आहेत. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात स्थलांतरित आणि विकास या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेसाठी २५ विविध देशांमधून शंभरहून अधिक तज्ज्ञांनी भाग घेतला होता. १९९९ मध्ये अमेरिकेच्या ‘अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट’ द्वारे पटनाईक यांना ‘विशेष नेतृत्व परितोषिक’ मिळालेले आहे. तसेच इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर, केंब्रिज, लंडन यांच्याकडून मॅन ऑफ द मिलेनियम (सहस्रकातील मानव) असा गौरवही त्यांना प्राप्त झाला आहे.