Loading...

कृष्णमूर्ती श्रीनिवासन

मानद आचार्य, इन्स्टिट्यूट फॉर सोशल अण्ड इकॉनॉमिक चेंज, बेंगळुरू

कृष्णमूर्ती श्रीनिवासन गेली पाच दशके त्यांच्या संशोधनाद्वारे लोकसंख्येसंबंधीच्या अध्ययनामध्ये अमूल्य योगदान देत आहेत. श्रीनिवासन हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकसंख्याशास्त्रज्ञ असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्या आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे ते सदस्य होते. सन १९७८ ते १९९२ पर्यंत ते आंतरराष्ट्रीय लोकसंख्याशास्त्र संस्था, मुंबई येथे वरिष्ठ प्राध्यापक आणि संचालक म्हणून कार्यरत होते. सन १९९५ ते २००२ दरम्यान पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी कुटुंबनियोजन, पुनरुत्पादन आणि बाल आरोग्य कार्यक्रम या संबंधी अशासकीय संस्थांच्या भूमिकेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या लोकसंख्या विभागामध्ये त्यांनी काम केले असून त्यांच्या कामाचे अनेक राष्ट्रांमध्ये कौतुक करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघटना लोकसंख्या निधी यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या गटाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी चीनमधील लोकसंख्या संशोधन केंद्रांना धोरणांबाबत शिफारशी केल्या. प्राध्यापक श्रीनिवासन यांनी १५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत किंवा त्या पुस्तकांमध्ये योगदान दिले आहे. तसेच अत्यंत बारकाईने समीक्षा करण्यात आलेली १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रकाशने त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये भर घालीत आहेत. मद्रास विद्यापीठामधून त्यांनी गणित विषयामध्ये एम.ए. पदवी प्राप्त केली आणि नंतर कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेमधून संख्याशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठामधून सार्वजनिक आरोग्य या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि केरळ विद्यापीठामधून लोकसंख्याशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. प्राप्त केली. सन २०१३–१५ दरम्यान भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषदेच्या लोकसंख्येचे राष्ट्रीय फेलो म्हणून त्यांनी काम पाहिले तसेच चेन्नई येथील मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजशी संलग्न होते. सध्या, श्रीनिवासन हे बेंगळुरूमधील सामाजिक आणि आर्थिक बदल संस्थेमध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.