Loading...

घनश्याम शाह

इन्स्टिट्युट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी इन ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस, वासेनार, नेदरलँड्स

घनश्याम शाह हे सध्या नेदरलँड्समधील वासेनार येथील ‘नेदरलँड्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी इन ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस’ या संस्थेचे विद्यावृत्तीधारक आहेत. आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी सुरत येथील सेंटर फॉर सोशल स्टडीज् या संस्थेचे संचालक (१९७६ ते १९८५ आणि पुन्हा १९९१ ते १९९६), मसुरी येथील नॅशनल अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेचे डॉ. आंबेडकर प्रधान प्राध्यापक (१९९६–१९९७), तसेच नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील ‘सेंटर ऑफ सोशल मेडिसिन अँड कम्युनिटी हेल्थ’ या केंद्रामध्ये सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक इत्यादी पदे भूषवली आहेत. प्राध्यापक शाह यांनी दक्षिण गुजरात विद्यापीठातील लोकप्रशासन विभागामध्ये अध्यापन केले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, शिकागो विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग यांसारख्या अन्य ठिकाणी त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकवले आहे. त्यांना १९७९ आणि १९८० साली राज्यशास्त्र विषयातील संशोधनासाठी व्ही. के. आर. व्ही. राव पारितोषिक मिळाले असून १९९८ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा राज्यशास्त्र विषयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. घनश्याम शाह यांनी पंधराहून अधिक पुस्तकांचे लेखन, सहलेखन आणि संपादन केले आहे. यामध्ये ‘सोशल मूव्हमेंट्स अँड दि स्टेट’ (२००२), ‘दलित आयडेंटिटी अँड पॉलिटिक्स’ (२००१) आणि ‘पब्लिक हेल्थ अँड अर्बन डेव्हलपमेंट – दि स्टडी ऑफ सुरत प्लेग’ (१९९७) आदी पुस्तकांचा समावेश आहे.