Loading...
Taj

ताज हाश्मी

सिक्युरिटी स्टडीजचे प्राध्यापक, ऑस्टिन पे स्टेट युनिव्हर्सिटी, टेनेसी, यूएसए

ताज हाश्मी यांचा जन्म 1948 साली भारतातील आसाममध्ये झाला. त्यांनी ढाका विद्यापीठातून इस्लामी इतिहास आणि संस्कृती या विषयामध्ये बी.ए. (ऑनर्स) आणि एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून ‘आधुनिक दक्षिण आशियाई इतिहास’ या विषयामध्ये पीएच.डी. पूर्ण केली. हाश्मी सध्या टेनेसीमधील क्लार्क्सव्हिले येथे ऑस्टिन पे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संरक्षण अभ्यास या विषयाचे प्राध्यापक आहेत. यापूर्वी, त्यांनी कर्टिन युनिव्हर्सिटी (1987-1988), ढाका युनिव्हर्सिटी (1972-1981), नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (1989-1998) आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया (2003-2004) या विद्यापीठांसह बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि कॅनडामधील विविध विद्यापीठांमध्ये इस्लामी व आधुनिक दक्षिण आशियाई इतिहास आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्र या विषयांचे अध्यापन केले आहे. हाश्मी यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागात, तसेच हवाईतील होनालुलू येथे आशिया-पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज् या केंद्राअंतर्गत कॉलेज ऑफ सिक्युरिटी स्टडीजमध्येही संरक्षण अभ्यास विषयाचे प्राध्यापक म्हणून चार वर्षे काम केले आहे. हाश्मी बऱ्याच दक्षिण आशियाई आणि इस्लामी भाषांमध्ये पारंगत आहेत. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमधून ते चालू घडामोडी आणि जागतिक संघर्षांविषयी नियमितपणे भाष्य करत असतात. ते रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडचे(1997 पासून) अभ्यासवृत्तीधारक आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे सेंटर ऑफ इंटरनॅशनल स्टडीज् आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाचे नॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज् या केंद्रांचे ते अभ्यागत अभ्यासवृत्तीधारक होते. हाश्मी‘कंटेपररी साउथ एशिया’ आणि ‘दि जर्नल ऑफ साउथ एशियन स्टडीज्’ या दोन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांवर आहेत. सेज प्रकाशन आणि रॉटलेज प्रकाशन यांबरोबरच अन्य काही प्रकाशन संस्थांसाठी ते नियमितपणे हस्तलिखितांचे पुनरीक्षण करतात. हाश्मी यांनी दक्षिण आशिया, मध्य पूर्व, आशिया-पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकेतील इतिहास, समाज, धर्म, राजकारण, संस्कृती आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर विपुल प्रमाणात शैक्षणिक आणि लोकप्रिय निबंध व लेख लिहिले आहेत. त्यांची महत्त्वाची प्रकाशित पुस्तके खालीलप्रमाणे:

• विमेन अँड इस्लाम इन बांगलादेश : बियाँड सब्जेक्शन अँड टिरॅनी (2000).
• पाकिस्तान अॅज ए पिझंट युटोपिया : दि कम्युनलायझेशन ऑफ क्लास पॉलिटिक्स इन इस्ट बेंगाल, 1920-1947 (1992).
• कॉलोनियल बेंगाल (बंगाली भाषेत) (1985).
• इस्लाम, मुस्लीम्स अँड दि मॉडर्न स्टेट (सहसंपादक) (1994 आणि 1996).

त्यांचे ‘विमेन अँड इस्लाम इन बांगलादेश’ हे पुस्तक आशियाई अभ्यास विभागातील ‘बेस्टसेलर’ ठरले असून या पुस्तकास 2001 सालचे ‘जस्टिस इब्राहिम सुवर्णपदक’ (बांगलादेश) प्रदान करण्यात आले आहे.